कोरेगाव
प्रतिनिधी :दादा वाकडे
कोरेगाव शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील बाजारपेठेतील प्राचीन श्रीराम मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून भाविकांनी प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव साजरा केला.
शुक्रवारी दुपारी बरोबर १२ वाजता श्रीराम जन्माचा सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला. मंदिरात पाळण्यात श्रीरामाची प्रतिमा ठेवून भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यापूर्वी गुरुवारी सकाळी अभिषेक, ग्रंथवाचन आणि कीर्तन कार्यक्रम झाले. यानंतर आरती, रामनामाचा गजर आणि जयघोष करण्यात आला. प्रसादाचे वाटपही करण्यात आले. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
बाजारपेठेतील श्रीराम मंदिर हे सुमारे शंभर वर्षांपूर्वी स्थापन झाले असून मंदिरात पूर्व दिशेला श्रीराम, लक्ष्मण व सीतेच्या सुंदर मूर्ती आहेत, तर समोर हनुमंताची मूर्ती आहे. सागवानी धाटणीतील हे मंदिर भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे.
शहरातील विविध श्रीराम मंदिरांतही रामजन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. प्रत्येक मंदिरात रामजन्माचा पाळणा, आरती, भजने आणि रामनामाचा गजर करण्यात आला. प्रसाद वाटप करण्यात आले. रामनामाच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.

Post a Comment