महावितरण कंपनीच्या सातारा विभागाची स्पेशल ऑडिटसह उच्चस्तरीय चौकशी करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा शेतकरी हक्क परिषदेचा इशारा
सहसंपादक दादा वाकडे
सातारा : महावितरण कंपनीच्या सातारा विभागातील कारभाराची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून गेल्या पाच वर्षांचे स्पेशल ऑडिट करण्यात यावे, कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकारी व अभियंत्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी महावितरण कंपनीच्या कृष्णानगर येथील सातारा मंडळ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल सर्जेराव शिर्के यांनी दिला आहे.
यासंदर्भात महावितरण कंपनीचे सातारा मंडळाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हाळनोर यांना सोमवारी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता बारामती, जिल्हाधिकारी सातारा यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, सातारा विभागातील वीजजोडणी मंजुरी, विविध विकासकामांचे प्रस्ताव, टेंडर प्रक्रिया, कामाचे आदेश, निधी वितरण व तांत्रिक मंजुरी यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनावश्यक विलंब होत आहे. वारंवार नवीन त्रुटी काढून फाईली परत पाठविणे, आदेश प्रलंबित ठेवणे आणि तांत्रिक कारणे सांगून कामे अडविण्याच्या प्रकारामुळे शेतकरी, वीज ग्राहक आणि पात्र ठेकेदारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काही विशिष्ट ठेकेदारांना प्राधान्य देऊन इतर पात्र ठेकेदारांची कामे जाणीवपूर्वक अडविली जात असल्याच्याही तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा शेतकरी हक्क परिषदेने केला आहे. अनेक अधिकारी व अभियंते वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने प्रशासनावर अनावश्यक प्रभाव निर्माण झाला असून त्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कोरेगाव उपविभागातील ग्रामीण शाखेचे सहाय्यक अभियंता शिवाजीराव गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबाबतही शेतकरी व वीज ग्राहकांकडून तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणासंदर्भातील आवश्यक पुरावे शेतकरी हक्क परिषदेकडे उपलब्ध असून, सक्षम चौकशी यंत्रणा नियुक्त झाल्यानंतर ते सादर करण्यात येणार असल्याचे शिर्के यांनी स्पष्ट केले.
मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन स्वतंत्र चौकशी समितीमार्फत तपास, दक्षता विभाग आणि आवश्यक असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी, दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई आणि कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकरी हक्क परिषदेने केली आहे. अन्यथा स्वातंत्र्यदिनी सकाळी आठ वाजता महावितरण कंपनीच्या सातारा मंडळ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अनिल शिर्के यांनी दिला आहे.

Post a Comment