![]() |
: निगडी रंगनाथ स्वामींची येथे ज्योतिबा मंदिरासमोरील महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण करताना प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, मुन्नाभाई काझी, विजयराव जगताप व शेतकरी.
कोरेगाव
प्रतिनिधी:दादा वाकडे
अवघ्या २४ तासात ट्रान्सफॉर्मर बसवून निगडीतील शेतकऱ्यांना दिलासा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आदेशाने प्रश्न लागला मार्गी : प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे
कोरेगाव : निगडी (रंगनाथ स्वामी) परिसरातील अपशिंगे रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोरील महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर उच्च दाबामुळे शुक्रवारी सायंकाळी जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. पाणीपुरवठा खंडित झाल्याने पिके धोक्यात आली होती. मात्र, हा प्रश्न तातडीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अवघ्या २४ तासात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून कार्यान्वित करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कोरेगाव तालुक्यावर विशेष लक्ष आहे. त्यांच्यासह शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख हणमंतराव जगदाळे, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव व रणजीतसिंह भोसले यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जात आहेत, अशी माहिती कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली.
शुक्रवारी सायंकाळी ट्रान्सफॉर्मर अचानक जळाल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. याचा थेट परिणाम शेतातील विद्युत पंपांवर झाला आणि पिकांना पाणी देणे थांबले. उन्हाळ्याच्या तोंडावर उभ्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना वीज खंडित झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. काही ठिकाणी भाजीपाला व ऊस पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने विजयराव जगताप यांच्या माध्यमातून ही समस्या कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बर्गे आणि जगताप यांनी विलंब न करता पाटण येथे जाऊन पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. त्यांना निगडी येथील परिस्थिती सविस्तर सांगत, ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, असे स्पष्ट केले.
पालकमंत्री देसाई यांनी याची तातडीने दखल घेत महावितरण कंपनीच्या सातारा येथील कार्यकारी अभियंता डॉ. अमित बारटक्के यांना थेट दूरध्वनीवरून आदेश दिले. प्रशासनानेही तत्परता दाखवत आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. परिणामी रविवारी सकाळी ११ वाजता नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
नवीन ट्रान्सफॉर्मरच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी दुपारी पार पडला. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे बोलत होते. माजी नगरसेवक मुन्नाभाई काझी, कुमठे येथील विजय जगदाळे, विजयराव जगताप, माजी सैनिक शिवाजी जगताप, राजेश जगताप, किरण डांगरे, अनंता डांगरे, शिवनाथ डांगरे, रवींद्र जगताप, संजय जगताप, आबाजी जगताप, दादासाहेब जगताप, बाळकृष्ण जगताप, प्रशांत जगताप तसेच जनमित्र संदीप फणसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण करण्यात आले.
राजाभाऊ बर्गे पुढे म्हणाले, शिवसेना ही सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांची संघटना आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडविणे हे आमचे कर्तव्य आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्यातील प्रश्नांना प्राधान्याने न्याय दिला जात आहे. निगडी येथील ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न अत्यंत तातडीचा होता. पालकमंत्र्यांनी त्वरित लक्ष घालून महावितरण कंपनीच्या प्रशासनाला आदेश दिल्यामुळे हा प्रश्न एका दिवसात मार्गी लागला. यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य मोठे नुकसान टळले आहे.
यावेळी विजयराव जगताप आणि माजी सैनिक शिवाजी जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, गावातील वाढत्या वीज वापरामुळे सध्याचा ट्रान्सफॉर्मर अपुरा पडत आहे. त्यामुळे भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी निगडी गावासाठी आणखी एका नवीन ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे. यासाठी राजाभाऊ बर्गे यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून तो उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामस्थांनीही या कामाबद्दल समाधान व्यक्त करत राजाभाऊ बर्गे आणि प्रशासनाचे आभार मानले. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.
दरम्यान, ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यानंतर ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसह राजाभाऊ बर्गे यांनी ज्योतिबा मंदिरात जाऊन दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले आणि गावाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली.

Post a Comment