लोणंद कार्यक्षेत्रात दिमाखदार कार्यक्रम; मान्यवरांकडून बँकेच्या सामाजिक कार्याचे कौतुक
लोणंद:14 मार्च
माणदेश न्यूज संपादक: केशव जाधव
दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि. सातारा, शाखा लोणंद यांच्या वतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात पार पडला. शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
महात्मा गांधी विद्यालय, निरा येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सभासद, पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात रयत सेवक *बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मा. श्री. राजेंद्र शिर्के सर यांच्या**प्रास्ताविकाने झाली. त्यांनी बँकेच्या सामाजिक बांधिलकीचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या यशामागील पालकांचे कष्ट व शिक्षकांचे मार्गदर्शन यांचे महत्त्व अधोरेखित केले.
लोणंद येथे शाखा असली तरी बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासद राजेंद्र शिर्के सरांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, याची जाणीव ठेवून कार्यक्रम निरा येथे आयोजित केल्याबद्दल *निरा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. तेजश्री काकडे यांनी निरावासियांच्या वतीने शिर्के सरांचे अभिनंदन केले.*
तसेच त्यांची *सासरवाडीही निरा येथे असल्याने भविष्यातही बँकेचे सर्व सभासद त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.*
यावेळी लोणंद *नगरपालिकेचे माजी *नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री. शिवाजी दादा शेळके-पाटील यांनी सांगितले की, लोणंद परिसरात अनेक बँका व पतसंस्था असल्या तरी रयत सेवक बँक ही अल्प व्याजदरात व कमी कागदपत्रांमध्ये कर्ज पुरवठा करणारी विश्वासार्ह बँक आहे. शाखा आकाराने छोटी असली तरी तिचे कार्य मोठे असून शिर्के सरांनी विविध सामाजिक उपक्रमांतून बँकेचे काम उंचीवर नेले आहे. नगरपालिकेच्या वतीने गरज पडेल तेव्हा बँकेच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असेही त्यांनी सांगितले.*
यावेळी रयत सेवक बँकेचे *चेअरमन श्री. नंदकिशोर गायकवाड यांनी सांगितले की, बँकेकडून रयत शिक्षण संस्थेला दिल्या जाणाऱ्या धर्मादाय निधीबाबत संस्थेची परवानगी मिळाल्यास निरा परिसरातील शाळांच्या भौतिक सुविधांसाठी आर्थिक मदत देण्याचा सकारात्मक विचार बँकेचा आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अल्प व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी बँकेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.**
कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार समिती सदस्य *मा. लक्ष्मणराव (दादा) चव्हाण* यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, लोणंद कार्यक्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणाऱ्या रयत सेवक बँकेच्या संचालक मंडळाचाही भविष्यात निरावासियांच्या वतीने सत्कार केला जाईल, असे सांगत त्यांनी शिर्के सरांना तसे नियोजन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत या सन्मानामुळे पुढील वाटचालीसाठी मोठी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सांगता सभासद प्रतिनिधी श्री. चंद्रकांत भोईटे सर यांनी आभार प्रदर्शनाने केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सभासद प्रतिनिधी राहुल खोपे सर, लोणंद बँक शाखाप्रमुख निलेश मेमाणे सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या भव्य कार्यक्रमामुळे लोणंद कार्यक्षेत्रातील सभासद, पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मा. राजेंद्र शिर्के सरांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment