*रयत सेवक बँक बारामती शाखेचा ८५ वा वर्धापन दिन जल्लोषात; गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार सत्कार…*
*शिक्षण, स्पर्धा परीक्षा व सामाजिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांना मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन*
*अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात..*
बारामती दि:१५मार्च
माणदेश न्यूज संपादक: केशव जाधव
: दि. रयत सेवक को-ऑप बँक लि., सातारा – शाखा बारामती यांच्या वतीने बँकेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त बारामती शाखा कार्यक्षेत्रातील सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ रविवारी उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज, बारामती येथे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी *महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार**यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या सहकार चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निमंत्रित असलेले मा. सचिन सदाशिव सातव (नगराध्यक्ष, बारामती) यांना अचानक मुंबईला जावे लागल्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाचे *अध्यक्षपद मा. नितीन शेंडे* (माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व कैलासवासी अजितदादांची बारामतीमधील धडाडणारी तोफ) यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक *मा. राजेंद्र शिर्के* यांनी केले. त्यांनी रयत बँक ही सभासद व त्यांच्या कुटुंबांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही बँकेची सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगितले.
मनोगत व्यक्त करताना *मा.विश्वास देवकाते पाटील* (पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते) यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चिकाटी, शिस्तबद्ध अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे ध्येय गाठावे, असे सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांचे यश हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी *मा. अविनाश देवकाते पाटील* (माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक, उद्योजक व बारामती तालुक्यातील उच्चशिक्षित व्यक्तिमत्व) यांनी शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे भक्कम भांडवल असल्याचे सांगत गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन केले.
*मा. योगेश (भैय्या) जगताप* (माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक, माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुक्यातील युवकांचे आशास्थान) यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून कठोर परिश्रमाच्या बळावर समाजात आदर्श निर्माण करावा, असे मार्गदर्शन केले.तर *मा. अमोल पाटील* (जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा) यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास ते निश्चितच मोठे यश संपादन करू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. सभासद प्रतिनिधी इंग्लिश गायकवाड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी *मा. नामदेव (नाना) शितोळे, मा. लालासाहेब नलवडे (सदस्य, जनरल बॉडी – रयत शिक्षण संस्था, सातारा), मा. सुभाष साहेबराव लकडे (सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल – रयत शिक्षण संस्था, सातारा) तसेच प्राचार्य मा. भगवान रावसाहेब भिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.*
कार्यक्रमात बारामती शाखा कार्यक्षेत्रातील सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहारदार शब्दात किशोरी सातव मॅडम यांनी केले.
शेवटी सभासद प्रतिनिधी मा. मस्के सर यांनी उपस्थितांचे आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
*अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चैनल ला सुद्धा सबस्क्राईब करा
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक केशव जाधव
mo:9096659088


Post a Comment