⚡ ब्रेकिंग News

साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोमवारी दौरा; धार्मिक कार्यक्रम, बैठक आणि भव्य जाहीर सभेचे आयोजन


कोरेगाव प्रतिनिधी: दादा वाकडे
साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक जण घेणार हातात धनुष्य बाण
फोटो ओळ : पत्रकार परिषदेत माहिती देताना शरद कणसे व हणमंतराव जगदाळे, शेजारी शंकरराव गोडसे व प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे.





साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोमवारी दौरा; धार्मिक कार्यक्रम, बैठक आणि भव्य जाहीर सभेचे आयोजन 


कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सातारच्या गांधी मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेत हातात घेणार धनुष्यबाण; होणार जोरदार पक्ष प्रवेश 


कोरेगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा शनिवार, दि. २० एप्रिल रोजी सातारा जिल्हा दौरा निश्चित झाला असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. धार्मिक, संघटनात्मक आणि राजकीय अशा तिन्ही अंगांनी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या दौऱ्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या दौऱ्याची माहिती देण्यासाठी कोरेगाव येथील हॉटेल दरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख हणमंतराव जगदाळे, जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, शेतकरी संघटनेचे शंकरराव गोडसे तसेच कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे उपस्थित होते. यावेळी त्यांनी दौऱ्याचे महत्त्व आणि तयारी याबाबत सविस्तर माहिती दिली.

या दौऱ्याची सुरुवात दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. हेलिकॉप्टरने एकनाथ शिंदे हे अंगापूर येथे दाखल होणार आहेत. चार वाजता अंगापूर येथील प्रसिद्ध श्री आत्म गजानन मंदिर येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाने होणार आहे. त्यानंतर अंगापूर पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर शरद कणसे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार असून तेथे कणसे कुटुंबीयांबरोबरच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधणार आहेत.

त्यानंतर सातारकडे प्रयत्न करणार असून सायंकाळी सहा वाजता सातारच्या शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत पक्ष संघटन विस्तार, आगामी राजकीय धोरणे आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बळकटी यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सायंकाळी सात वाजता सातारा येथील गांधी मैदान येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत असून या सभेला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. या सभेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असून धनुष्यबाण हाती घेणार आहेत.

शरद कणसे यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले असून आतापर्यंत सुमारे २२०० कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम त्यांनी केले असून सातारा जिल्ह्यावर त्यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळेच या जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले की, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केली असून त्यांनीही कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर दरे येथे जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या समवेत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विकास कामांवर चर्चा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

हणमंतराव जगदाळे यांनी पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याचे सांगत शिवसेनेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. गावोगावी शाखा स्थापन करून युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. साताऱ्यातील ही जाहीर सभा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि विक्रमी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गांधी मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांपासून ते जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत सर्वांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सातारा जिल्ह्याला सर्वाधिक विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा विशेष गौरवही करण्यात येणार असल्याची माहिती जगदाळे व कणसे यांनी दिली.

एकूणच, धार्मिक कार्यक्रम, संघटनात्मक बैठक आणि भव्य जाहीर सभा अशा त्रिस्तरीय कार्यक्रमामुळे एकनाथ शिंदे यांचा सातारा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार असून आगामी काळातील स्थानिक राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...